मानवमित्र ऑर्गनायझेशन च्या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत !!

9 September 2015

सरकारी शाळांमधील सकारात्मक चित्र

मागील काही दिवसांपासून सरकारी शाळा हा मिडिया मध्ये चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. थोडे मागच्या महिन्यात गेलो तर जानेवारी मध्ये प्रथम चा अहवाल , परत दप्तराचे ओझे, नंतर व्हावचरसिस्टम,आणि काल परवा  वास्तव मराठी माध्यमाच्या शाळांचे असे अनेक विषय चर्चेत आहेत. या विषयांचा जरा खोलात जाऊन विचार केला तर सरकारी शाळांचे एक नकारात्मक चित्र नकळत तयार केले जातेय असे म्हणायला वाव आहे. कारण प्रथम ने दरवर्षी प्रमाणे आपला तथाकथित अहवाल मांडून सरकारी शालंची भयावह स्थिती मांडली.( अर्थात मी या अहवालाशी पूर्णतः असहमत आहे).यावर मिडीयात खूप चर्चा झाली. लगेच शिक्षण मंत्र्यांनी एक समिती नेमली असर चा अभ्यास करायला.त्यानंतर .लगेच दप्तराच्या ओझ्याचा विषय नको इतका महत्वाचा केला कि सरकारला शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी लागली.हा विषय सरकारी शाळांशी तितकासा संबंधित नाही.मात्र मिडीयाच्या दबावापुढे काय करणार ?? तोच हेरंब कुलकर्णी यांनी व्हावचरसिस्टम चा अवलंब करण्याची मागणी करीत धमाल केली..अर्थात याला तितकेच समर्थ उत्तर किशोर दरक यांनी दिल्याने तो विषय फारसा ताणला गेला नाही. आता जरा स्थिर होतोय तोवर वास्तव मराठी शाळांचे या विषयावर चर्चा एका channel वर झाली आणि पुन्हा आमच्या शाळा प्रकाशझोतात आल्या. पण मी आज केवळ सकारात्मक बदल तुमच्या समोर मांडणार आहे.कारण माणूस कुत्र्याला चावला हि मिडिया साठी बातमी असते. कुत्रा माणसाला चावला  अशी बातमी तो कुत्रा कोणाचा आहे या वर अवलंबून आहे.त्यामुळे सरकारी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते  या शाळा खाजगी शाळांपेक्षा कुठे हि कमी नाहीत असा बेंगलोर विध्यापिठातील संशोधन अहवाल लोकमान्य लोकशक्ती असे बिरूद मिळवणाऱ्या वृत्तपत्राने आतील पानावर छापला आणि प्रथम चा तथाकथित अहवाल पहिल्याच पानावर छापला . यावरून मिडिया चा दृष्टीकोन तुम्ही शिक्षक बांधव समजून घ्याल. असो मूळ मुद्दा बाजूला राहतोय.
मला सोशल मिडिया वर मात्र याच्या उलट चित्र दिसतेय. महाराष्ट्राला पाहिल्यादा एक तरुण ,तडफदार,  पूर्णवेळ शिक्षणमंत्री मिळालाय. त्यांना जेंव्हा ब्रीफिंग करताना अधिकार्यांनी सांगितले कि सरकार शिक्षणावर एकूण ३२००० कोटी खर्च करते . त्यापैकी २८००० कोटी केवळ शिक्षकांच्या पगारावर खर्च होतात , त्यामुळे आपण ४००० कोटी मध्ये काय विकास करणार???यावर त्यांनी असे उत्तर दिलेय कि पगारावर खर्च म्हणजे वायापट खर्च नसून माझ्यामते ती एक गुंतवणूक आहे. आणि त्याचे रिटर्न मी गुणवत्तेच्या माध्यमातून घेणारच.असे बाणेदार उत्तर देत शिक्षकांवर विश्वास दाखवणारा मंत्री हा माझ्या मते फार चांगला सकारात्मक बदल आहे. या मंत्र्यांनी अजून एक महत्वपूर्ण बदल केला ,तो म्हणजे शिक्षण सचिव म्हणून नंदकुमार यांची नियुक्ती. कदाचित मिडिया च्या दृष्टीने हा एक निर्जीव असा प्रशासकीय बदल असेल. मात्र मला वाटते मंत्री आणि सचिव यांची हि जोडी राम-लक्ष्मण जोडी सारखी आहे. नंदकुमार यांची सचिव पदी निवड झाल्याचे ज्या प्रकारे शिक्षकांनी सोशल मिडिया वर स्वागत केलेय ते पाहता आता महाराष्ट्रासाठी शिक्षणाच्या बाबतीत अच्छे दिन आता दूर नाहीत असे आशावादी चित्र नक्कीच आहे.
वाचक हो केवळ मंत्री , सचिव पदावर चांगली माणसे आली म्हणून चांगले चित्र लगेच निर्माण होणार असा भाबडा आशावाद मी बाळगतोय असे तुम्हाला वाटेल.पण मला असे का वाटतेय तर या दोन व्यक्तींमुळे काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालाय तो मला खूप आशादायी वाटतोय. राज्यातील उपक्रमशील शिक्षकांनी ,त्यांच्या गटांनी ज्या तडफेने काम सोशल मिडीया वर मांडलेय ते पाहून मला आनंद वाटतोय.अशाच काही शिक्षकांची मी ओळख करून देतो. अगदी संक्षिप्त रुपात.

·         आपली शाळा डिजिटल करावी , शाळेत इ-लर्निंग ची सोय असावी म्हणून जि.प.शाळा  हेलस.ता. मंठा जि.परभणी च्या अंबादास मोरे ( आडनाव कदाचित चुकले आहे असे मला वाटतेय) या नी गावभर पोतराज बनून लोकवर्गणी गोळा केली.या समर्पण वृत्तीला मी सलाम करतो. आणि अगदी ठामपणे सांगतो हे असे काम केवळ आमचा सरकारी गुरुजी च करू शकतो.



·         आता हा वर्ग पहा .वाटेल दुपारची सुट्टी झाली असावी त्यामुळे या मुली अशा बसल्या असाव्यात .पण तुम्ही फसलात ह. शाळा सुरु आहे, आणि बाई पण वर्गात आहेत.पण या बाईंची विशेषता अशी कि यांच्या शाळेत  मुले अशी स्वच्छंद असतात.या बाई म्हणजे मुलांच्या आवडत्या बाई वैशाली ताई गेडाम.या चंद्रपूर मध्ये सेवा करतात.यांना भेटलात ना तर तुम्हाला देखील यांच्या शाळेत विद्यार्थी बनून जाण्याचा मोह आवरणार नाही.
·         संदीप गुंड :: पाष्तेपाद्याचा हा तरुण शिक्षक .एक अशी नवी क्रांती याने पाड्यावर केलीय कि दप्तराचे ओझे  हा विषय त्याने कधीच सोडवलाय. कमी खर्चात तंत्रज्ञानाचा वापर करून शाळा कशी तंत्रस्नेही करावी याचा एक आदर्श नमुना त्याने सादर केलाय.सरकारी शाळेतील मुले tablet च्या मदतीने शिकत आहेत हे स्वप्न त्याने सत्यात उतरवून दाखवलेय.
·         अनिल सोनुने: जालना जि.प. मध्ये कार्यरत असणारे अनिलजी म्हणजे microsoft मधील महाराष्ट्राचा icon. कधी कल्पना तरी केलीय का , आपल्या जि.प. चा गुरुजी आपले उपक्रम सादर करायला थेट अमेरिकेत जाईल म्हणून. पण हे सत्य आहे. अचाट कल्पनांच्या जोरावर त्यांनी हे करून दाखवलेय.
असे अनेक हिरे या महाराष्ट्रात आहेत . ते आता हळू हळू प्रकाशात येतीलच. केवळ शब्द मर्यादा म्हणून मी प्रातिनिधिक नामोल्लेख केलाय.
आजवर केवळ शिक्षकच उपक्रमशील असतात असा जर तुमचा समज असेल तर मग वाचा प्रतिभा भराडे ( विस्ताराधिकारी ,सातारा) , तृप्ती अंधारे( गटशिक्षणाधिकारी,भूम)  ज्योती madam(गटशिक्षणाधिकारी,पुरंदर) विकास यादव( विस्ताराधिकारी, माढा) राजेंद्र बाबर( शिक्षणाधिकारी,सोलापूर) याची संक्षिप्त कार्य ओळख.
प्रतिभा ताई भराडे या सातारा जि.प. मध्ये शिक्षण विस्ताराधिकारी पदी कार्यरत आहेत.दप्तराविना शाळा , रचनावादी आनंददायी शिक्षण पुरस्कर्त्या म्हणून यांची ओळख आहे. आणि  हो त्यांच्या बीट मध्ये मार्च मधेच पहिलीचे वर्ग सुरु होतात ही बाब निश्चित नोंद घेण्याजोगी आहे.
तृप्ती अंधारे यांच्या कार्याची ओळख तर आता महाराष्ट्र भर झालीय. शिक्षकांना शिक्षा न करता त्यांच्या कडून काम करून घेण्यात यांनी यश मिळवलेय. सुंदर हस्ताक्षर साठी चा त्यांचा नवीन उपक्रम सध्या खूप चर्चेत आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या smile चे रबरी शिक्के बनवून घेतलेत.
पुरंदर च्या गटशिक्षणाधिकारी ज्योती ताई सध्या iso शाळांमुळे खूप चर्चेत आहेत. ज्या वेगाने पुरंदर तालुक्यातील शाळा iso मानक मिळवत आहेत ते पाहता काही महिन्यात तो पूर्ण तालुकाच iso मानक प्राप्त होतोय का काय असे वाटतेय.

आमच्या सोलापूर चा विचार केला तर शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांच्या तंत्रस्नेही कामाने सोलापूर शिक्षण विभागाने तंत्रज्ञानाच्या वापरात आघाडी घेतली असे म्हणू शकतो.कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणऱ्या माढा तालुक्यात विकास यादव यांनी सर्वाधिक शाळा अ श्रेणीत आणण्यासाठी जे प्रयत्न केलेत ते निश्चित पणे अभिनंदनास पात्र आहेत.
थोडक्यात काय शिक्षक काय किंवा अधिकारी काय सारेच सध्या कार्यप्रवण झालेत. माझ्या या सकारात्मक चित्राला अंक शास्त्रीय दृष्ट्या पाठबळ देणारा अभ्यासपूर्ण लेख वसंत काळपांडे सर पुढील काही दिवसात मांडतील. पण जाता जाता माझ्या शिक्षक बांधवांना एक आवाहन करतो कि आपण केवळ आपले काम करावे, पेपर ला बातमी नको द्यायला. उगाच पेपरबाजी नको करायला हि मानसिकता बदला. शाळेतील प्रत्येक चांगली बाब समाजासमोर आली पाहिजे. कारण शालेय तुम्ही काय करता हे समाजासमोर यायला हवे असे मनापासून वाटते.
                                  -ranjitsinhdisale.blogspot.in

No comments:

Post a Comment

About